उस्मानाबाद । भाजप नेते एकनाथ खडसे विरोधक म्हणून सर्वात प्रभावी होते. सभागृहात आक्रमक आणि सक्रीय म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. मात्र त्यांची योग्य नोंद भाजपाने घेतली नाही. पुढील राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला सोडून गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. मात्र उस्मानाबादमधील सोडून गेलेल्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, असे सांगत शरद पवार यांनी चक्क हात जोडले. शरद पवारांच्या या विधानामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर तुळजापूर येथे अधिकार्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. दुसर्या दिवशी सोमवारी तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता, हात जोडून उस्मानाबाद जिल्ह्यातून आपल्याला सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षप्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट केले. दिल्या घरी सुखी रहा, असे थेट विधान करीत पवारांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली.
मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. खडसेंनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. भाजपाने सर्वाधिक प्रभावी असलेल्या खडसेंची पाहिजे तशी नोंद घेतली नाही. मात्र राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पवारांनी आपली भावना व्यक्त करीत असतानाच खडसे यांच्या कामाचे एकीकडे कौतूकही केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”