हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले.
बारामती येथे शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटके बद्दल विचारला असता हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले.काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन प्रकरणावरुन अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती.
तत्पूर्वी, सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group