हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबर ला वाढदिवस आहे.शरद पवार 81 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. परंतु कोरोनामुळे यावर्षी आदरणीय पवारसाहेब व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तसेच यावेळेस भेटण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर कोरोना नियमांचे पालन करुन व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (१२ डिसेंबर) रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही व्हर्च्युअल रॅलीचे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचेही जयंंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ असा आगामी काळाकरिता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.