हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी न्यायालयाकडे केली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा बनावट असून, तो रद्द करावा, अशी मागणी समीर खान यांनी केली आहे.
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर एनसीबीच्यावतीने अमलीपदार्थांच्या तस्करीचा ठपका ठेवून, अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, विशेष न्यायालयाने खान यांची जामिनावर सुटका केली. खान यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आता यानंतर गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी खान यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
समीर खान यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना न्यायालयासमोर न्यायवैद्यक अहवालाचा दाखला दिला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार आपल्याकडे सापडलेला पदार्थ अमलीपदार्थ नव्हता. त्यामुळे अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे समीर खान यांनी म्हंटले आहे.