हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नसून देशातील वातावरण मात्र नक्कीच तापलं आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.
मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव:… परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिसा सुळे यांनी म्हटलं आहे. ‘एएनआयशी’ त्या बोलत होत्या.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं सुळे म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’