हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडीचा दणदणीत विजय झाला. पण या निकालामध्ये भाजप खातेही उघडू शकले नाही. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा अनेक वर्षापासून दबदबा आहे. पण, या निकालामध्ये लक्ष वेधून घेतले ते राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी! राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजय झाले असून, राष्ट्रवादीने केरळ विधानसभेमध्येही आपला विस्तार केला आहे. यामुळे, केरळमध्ये भाजपला राष्ट्रवादी वरचढ ठरली, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतात आहे.
राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या दोन उमेदवारांपैकी थॉमस के हे कुटूनाड येथून तर एके ससिंद्रण यांचा इलाथुरमधून विजय झाला आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी ही महत्त्वाची ठरली आहे. भाजपला एकही जागेवर जिंकता न आल्याने मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे.
अनेक वर्षापासून केरळची सत्ताही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडी यांच्याकडेच राहिली आहे. त्यामुळे यावर्षी काय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अशातच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष दिल्यामुळे या निवडणुका फार महत्त्वाच्या ठरल्या होत्या. परंतु, भाजपला केरळच्या जनतेने स्पष्टपणे नाकारल्यामुळे केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला वरचढ ठरली अशीच भावना राजकीय वर्तुळात आहे.