सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा- पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा (ता. कोरेगाव) येथे तडवळे सं. कोरेगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे कोरेगावचे नेते शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे. कोरेगावात शिंदे- शिंदे यांच्यातील संघर्ष कायमच पहायला मिळत आहे.
यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे माजी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. दिपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, महेश बर्गे यासह आ. महेश शिंदे गटाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर आपल्या गावरान बोली भाषेतून टीकास्त्र सोडले. तसेच आ. शशिकांत शिंदे यांनी जनतेची कामे करण्याऐवजी यमाई कशी प्रसन्न राहिल, हे जरंडेश्वर कारखान्यावर जावून पाहिल्याचे आ. महेश शिंदे यांनी म्हटले. यावेळी आ. अजित पवार, आैंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी, आ. शशिकांत शिंदे यांच्यावर आ. महेश शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.