कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणा-या मारूल हवेली ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गावात राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली. सरपंच पदासह 7 जागांवर विजय मिळवत पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचा धुव्वा उडवला आहे.
मारूल हवेली हे खा.श्रीनिवास पाटील यांचे गाव असल्याने ह्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. देसाई गटाने यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची बनवून राष्ट्रवादीला कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मातब्बर कार्यकर्त्यांना देसाई गटाने निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री निनाईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवारासह 7 जागांवर विजय मिळवला आहे. सरपंच पदी आक्काताई जगन्नाथ मस्के यांनी निता शरद मस्के यांचा दणदणीत पराभव केला आहे. तर सदस्य पदी नितीन शिंदे, पूनम मोरे, माधवी कांबळे, गणपत पाटील, शंकर नांगरे, जालिंदर माने, कोमल पाटील यांचा विजय झाला आहे. तर देसाई गटाचे उषा पाटील, शिल्पा हिरवे, संगिता जाधव व अरूण जाधव यांचा विजय झाला आहे.
राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देसाई गटाने गावात सर्व ताकद पणाला लावली होती. त्यात कामगार युनियनचे माजी अध्यक्ष विजयराव मोरे यांच्यासह अन्य मातब्बरांची उमेदवारी देण्याबरोबरच सोशल मिडीयावरील प्रचार व मतदारांशी संपर्क वाढवला होता. परंतु मतदारांनी त्यांना फारसा प्रतिसाद न देता पुन्हा एकदा सारंग पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.