हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्याला आता स्वतःचे आणि हक्काचे विमानतळ मिळणार आहे. कारण की, आता सरकारकडून पुणे जिल्ह्यात आणखीन एक विमानतळ सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमानतळ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या पुणे शहराकडे स्वतःचे असे विमानतळ नाहीये. पुणे शहराची सर्व विमाने लष्कराच्या लोहगाव विमानतळावरुन जात असतात.
पुणे जिल्ह्यात नवीन विमानतळ सुरू करण्यासाठी बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या बैठकीत राज्यातील बारामतीसह नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ या भागात देखील विमानतळे उभारण्यावर चर्चा करण्यात आली आहे. परंतु, याबाबतचा निर्णय एमआयडीसीकडे देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात विमानतळ उभारण्यात आल्यानंतर जिल्ह्याची शोभा वाढणार आहे.
दरम्यान, गेल्या चौदा वर्षांपासून नांदेड ,लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती येथे विमानतळ सुरू करण्याचा प्रस्ताव रखडला होता. खाजगी कंपन्यांकडून या संदर्भात पावले उचलली न गेल्यामुळे या प्रस्तावाला पुढे ढकलण्यात आले नाही. मात्र आता अखेर एमआयडीसीकडे ही विमानतळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लवकरच राज्यात आणखीन पाच विमानतळे उभारली जाऊ शकतात. मुख्य म्हणजे, पुढे जाऊन पुणे जिल्हयात आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु होण्याची शक्यता आहे.