सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार येत्या १४ जून रोजी होण्याची शक्यता असून यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे , तर भाजप-सेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात सांगली जिल्हा मात्र मंत्रिपदापासून वंचित राहतो की काय, अशी परिस्थिती आजही कायम आहे.
नव्या विस्तारात सांगलीच्या एकाही आमदाराच्या नावाची चर्चा नाही. सदाभाऊ खोत यांना मिळालेले मंत्रिपद पूर्वी स्वाभिमानीचे होते , पण आता ते भाजपचे म्हणूनच गणले गेल्यामुळे इतर आमदारांना संधी मिळाली नाही , तसेच खा.संजयकाका पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा सांगलीचा दावा आणखीनच कमकुवत बनला.
राज्यात भाजप-सेनेचे सरकार ज्यावेळी बहुमताने आले त्यावेळी पालकमंत्रीपद हे आ.सुरेश खाडे यांच्या गळ्यात पडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती , मात्र दोन-तीन वेळा चर्चा होऊनदेखील खाडे यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नाही. सांगली जिल्ह्याने भाजपला भरभरुन देऊनदेखील कोणत्याच नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदारांच्यामध्ये सातत्याने नाराजी आहे.