मुंबई | कोरोना संकटाशी लढत असताना राज्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा ८ लाखांच्या घरात पोहचला असताना लॉकडाऊनमधील अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे लोकांना आता आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंदिरं आणि जिम यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही.