नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्नच्या नवीन आयटी पोर्टलमधील तांत्रिक दोषांमुळे टीकेला सामोरे जाणारी देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांनी बुधवारी सांगितले की,”त्यांच्या कंपनीने डेव्हलप केलेले नवीन पोर्टल सातत्याने सुधारत आहे.” त्यावर आतापर्यंत 1.9 कोटी रिटर्न दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,”करदात्यांच्या चिंता निरंतर सोडवल्या जात आहेत.” दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीचे निकाल जाहीर केल्यानंतर पारेख म्हणाले, “आम्ही इनकम टॅक्स सिस्टीममध्ये सातत्याने सुधारणा पाहत आहोत. कालपर्यंत आमच्याकडे 1.9 कोटीपेक्षा जास्त रिटर्न होते जे नवीन सिस्टीमचा वापर करून दाखल केले गेले आहेत. आज इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म 1 ते 7 सर्व कार्यरत आहेत. बहुतेक वैधानिक फॉर्म सिस्टीमवर उपलब्ध आहेत.”
मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले नाही की, या तांत्रिक अडचणी पूर्णपणे कधी दूर होतील आणि पोर्टलवरील सर्व सुविधा टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांसाठी उपलब्ध असतील. पारेख म्हणाले की,” 3.8 कोटी युझर्सनी विविध ट्रान्सझॅक्शन पूर्ण केले आहेत आणि दररोज 2-3 लाख रिटर्न दाखल केले जात आहेत.”
इन्फोसिसला 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळाले
इन्फोसिसला पुढील पिढीची इन्कम टॅक्स भरण्याची सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. याचा उद्देश्य रिटर्नचा छाननी वेळ 63 दिवसांवरून एक दिवसावर कमी करणे आणि रिफंडच्या प्रक्रियेला गती देणे हा होता.
7 जून रोजी नवीन पोर्टल सुरू झाले
नवीन इन्कम टॅक्स पोर्टल http://www.incometax.gov.in 7 जून रोजी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. इन्फोसिसने ही नवीन वेबसाईट तयार केली आहे.