सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : भाजीपाला, दूध घरपोच तर शेतिविषयक दुकाने दुपारपर्यंत : जाणून घ्या कोणत्या गोष्टींना मिळणार सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस लाॅकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनीही लाॅकडाऊन संदर्भात काहीशी शिथिलता दिलेली आहे. 1 जून ते 8 जून सकाळी 7 वाजेपर्यंत नविन आदेश काढला आहे. यामध्ये शेतिविषयक दुकाने सकाळी 9 ते 3 सुरू राहतील तर भाजीपाला, दूध यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली असून केवळ घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील, असा नवा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काढला आहे.

नव्या देण्यात आलेल्या आदेशात दूध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 आणि रात्री 6 ते 8 सुरू राहतील तर दूध वितरणाबाबत केवळ घरी जावून देण्यास परवानगी राहील. शेतीविषयी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत चालू राहतील. तर सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. रास्त भाव दुकानेही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. बाजार समित्या केवळ घाऊक व्यापाऱ्यांसाठी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर भाजीपाला सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत घरपोच देण्यास परवानगी राहील.

खाजगी व सहकारी बॅंका शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज व्यवहारासाठी 11 ते 2 या वेळेत चालू राहतील. इतर सर्व व्यवहार बदं राहणार आहेत.

किराणा व व्यापारी दुकाने बंदच राहणार

सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते, तसेच इतर सर्वच व्यापारी दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहे. भाजी मंडई, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, फिरते विक्रेते यांच्यासह खाद्यपदार्थ आणि बेकरी बंद राहणार आहेत. उपहारगृह, हाॅटेल, बार, माॅल बाजार, मार्केट सर्व बंद राहणार आहे. मटण, चिकन, अंडी व मासे विक्रीही बंद राहणार आहे.

सविस्तर अध्यादेश खालीलप्रमाणे –

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सध्याचा लॉकडाऊन दि. 15 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. तथापि, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 01 जून 2021 रोजीचे 07.00 वा पासून ते दिनांक 08 जून 2021 रोजीचे 07.00 वा पर्यंत खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.

कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी

सातारा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. या कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.

पुढील नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. पुढील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. या आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना ( Exemption Category) यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल

रुग्णालये ,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स. दुध संकलन केंद्रे सकाळी 07.00 ते 09.00 व सायंकाळी 6.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल. शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 या वेळेत चालू राहतील. तसेच घरपोच सेवा सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल. शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील. शीतगृहे व गोदाम सेवा. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम व सर्व लोकांची इमारतीबाबतची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळची कार्यालये (SEBI) आणि (SEBI) मान्यता प्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा.स्टॉक एक्सचेंज (stock exchanges) डिपॉजिटर्स व क्लिअरींग कार्पोरेशन व (SEBI) कडे नोंदणीकृत असलेले एजंट, टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा, ई – व्यापार फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी), प्रसार माध्यमे (Media), पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सुट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील. पाणी पुरवठा सेवा,सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा. ATM’s सेवा, टपाल सेवा, लस/औषधे/जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टमहाउस एजंट (Custom House Agent/ परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स Multi Modal Transport Operators ), कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging material) ची उत्पादन केंद्रे, रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत चालू ठेवणेस परवानगी असेल. औषधे दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील औषध दुकाने 24 तास चालू ठेवणेस परवानगी असेल. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू राहतील. या कालावधीत फक्त घाऊक व्यापाऱ्यांना खरेदी करता येईल. तेथे किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेता यांना खरेदी करणेस मनाई आहे. घाऊक व्यापारी यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी नियोजन करावे व त्याचे पर्यवेक्षण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी करावे. तसेच घरपोच फळ व भाजीपाला सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत पुरविणेस परवानगी राहील व याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander यांनी नियोजन करावे. या नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी पुढील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण/संस्था यांनी हि बाब विचारात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध/निर्बंध नसून सदरचे प्रतिबंध/निर्बंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवे मध्ये गणल्या जातील.

या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खालील निर्देशांचे पालन करावे

संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारीव ग्राहक हे कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी आवश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर र.रु 500 /- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड – 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच ,इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणे करून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.

सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील –

व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील.मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील
रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील. सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. सर्व बेकरी पदार्थ विक्री पूर्णपणे बंद राहतील. माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँका व सहकारी बँका यांचेशी संबंधित फक्त शेतक-यांना खरीप हंगामाचे अनुषंगाने पीक कर्जाचे कामकाज, ATM’s मध्ये पैसे भरणे, Cheque Clearance, Data Centre ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत चालू राहील. तसेच सदर बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediariesincluding standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार पूर्णपणे बंद राहतील. सर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील. सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions) पूर्णपणे बंद राहतील.बांधकाम क्रिया (Costruction Activity) पूर्णपणे बंद राहतील. तथापि, आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने मान्सून पूर्व अत्यावश्यक असलेले काम करणेस परवानगी असेल.

प्रवासी वाहतूक : सार्वजनिक वाहतूक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील. इतर सार्वजनिक वाहतूक (उदा.रिक्षा, टैक्सी-4 चाकी) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी पुढील क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.रिक्षा- चालक+ 2 प्रवासी, टैक्सी (4 चाकी)- चालक+ RTO नियमाच्या 50 % प्रवासी 3. वाहतुकी दरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. . सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. टॅक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. प्रत्येक प्रवासा नंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड –19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टॅक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल. सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये (General Compartment) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवाहतुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील. बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.

खाजगी वाहतूक : सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील. खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी. आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस्थिती किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस र.रु.10,000 /- इतका दंड आकारला जाईल. खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील. उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस ऑपरेटर द्वारे गृह विलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे. थर्मल स्कॅनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्या विरोधात र.रु.10,000/- इतका दंड आकारील आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.

सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)
कार्यालये : पुढील कार्यालयांना सूट असेल केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये . विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. औषध उत्पादन/ वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय
कोव्हीड-19 सबंधित अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15% क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील. उपरोक्त नमूद इतर सर्व कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15% क्षमतेसह अथवा जास्तीत जास्त 5 व्यक्तींच्या/ कर्मचारी/ अधिकारी यापैकी जे जास्त असेल इतक्या उपस्थितीसह सुरु राहील. या आदेशामधील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल. या कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालया बाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*रेस्टॉरंट, बार, हॉटेल* : सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल (लॉजिंग) आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट सुरू राहील. बार सेवा बंद राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा (Home Delivery) बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा (Home Delivery) लागू राहणार नाही. हॉटेल्स मधील रेस्टॉरंट हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेले ग्राहक यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्यक्तींना राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. ही कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. रेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*उत्पादन क्षेत्र* : पुढील नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील. या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील. ज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे सुरु राहतील. ज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या 50 % क्षमतेच्या उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. सुरु असलेली उत्पादन केंद्रे जर ऑक्सिजनचा वापर करीत असतील तर ते फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या माल उत्पादनासाठीच असेल याची खात्री करावी. तसेच सदर उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखाना परीसरामध्येच करणे अपेक्षित आहे. जर ते कारखाना क्षेत्राच्या बाहेर राहत असतील तर त्यांची हालचाल हि शक्यतो (ISOLATION BUBBLE) मध्येच होत असलेची खात्री करावी.
सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करूनघ्यावे. जे कारखाने केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.
कारखाने व उत्पादन केंद्रे यांना पुढील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस, कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. ज्या कारखाने/ उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने/ उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षा उपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रा पर्यंत घेवून जावे लागेल. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने/ उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील. गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवूनये. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तरत्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.
*वर्तमानपत्रे* / *मासिके*/ *नियतकालिके* : वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल. वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके यांची फक्त घरपोच सेवा सुरु राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.* : सिनेमागृहे बंद राहतील. नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील. करमणूक नगरी/ आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. जल क्रीडा स्थळे बंद राहतील. क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रण बंद राहील. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) बंदराहतील.
*धार्मिक प्रार्थनास्थळे* : सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. धार्मिक प्रार्थना स्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल. धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स* : केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*शाळा व महाविद्यालये* : शाळा व महाविद्यालये बंद राहतील. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सातारा जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास सदर परीक्षेस व्यक्तीशःउपस्थित राहणे आवश्यक आहे, अशा वेळी परीक्षार्थीस एका प्रौढ व्यक्तीसोबत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम* : सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील. जास्तीत जास्त 25 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल. एका हॉल / कार्यालया मध्ये एकच लग्न समारंभ 2 तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त 25 व्यक्ती / नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबास र.रु.50,000 /- इतका दंड आकारला जाईल. सबंधित कार्यालय क्षेत्र हे कोव्हीड-19 हि आपत्ती म्हणून घोषित असेल तोपर्यंत बंद करणेत येईल.
ii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल. लग्न समारंभाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) नसलेस/ लसीकरण करून घेतलेले नसलेस त्यास प्रत्येकी र.रु.1,000/- व सबंधित आस्थापनेवर र.रु.10,000/- इतका दंड आकारणेत येईल. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. एखाद्या धार्मिक / प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करणेत आलेले असलेस, लग्न समारंभ यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेचे अटीवर परवानगी देणेत येत आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.
*ऑक्सिजन उत्पादक* : ऑक्सिजन कच्चा माल असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांवर बंदी घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असल्यास किंवा अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीनंतर सुरु ठेवण्यात येतील. ऑक्सिजनचे उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यांनी त्यांचे उत्पादन आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. त्यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून त्यांचे ग्राहक व पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा अंतिम वापर दिलेल्या निर्देशानुसार प्रसिध्द करावा.
*ई – व्यापार* : ई –व्यापारास फक्त या आदेशातील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद अत्यावश्यक वस्तू व सेवेसाठी परवानगी असेल. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जर सदर ई-व्यापार संस्था कंपनी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी पत्र असेल तर सदर संस्थेने कॅम्प आयोजित करून त्यांचे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जे कर्मचारी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारीयांचे संपर्कात येत नाहीत त्यांचेसाठी या आदेशातील मुद्दा क्र.5 प्रमाणे कार्यवाही करावी. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारती मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारती मधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारती मधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्याक्तीयानी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल, तसेच सदर. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना अनुज्ञप्ती रद्द केली जाईल.
*सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies)* : कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे). कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10,000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षणकामी वापरला जाऊ शकतो. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी त्यांचे आवार / इमारतीमध्ये नियमित प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) घ्यावा.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.