हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सूर असलेली भारत जोडो यात्रा जोरदार चर्चेत आहे. राहुल गांधी थेट जनतेत उतरले असून लोकांशी संवाद साधत आहेत. कन्याकुमारी पासून सुरु झालेली ही यात्रा कर्नाटकात आली आहे. याच दरम्यान, भारत जोडो यात्रेतून नव्या राहुल गांधींचा उदय झाला आहे असं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हंटल आहे.
जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेतून नव्या राहुल गांधींचा उदय झाला आहे. भाजप आणि आरएसएसला बॅकफूटवर येण्यास भाग पाडले गेले आहे. भाजपवाले परेशान झाले आहेत कारण भारत जोडो यात्रेतून नवे राहुल गांधी आणि नवा काँग्रेस पक्ष उदयास आला आहे. लोक आम्हाला विचारतात कि, भारताला कोण तोडत आहे ज्यासाठी तुम्ही भारत जोडो यात्रा काढताय, त्यांना मी हेच सांगेन की, मोदींची विचारधारा, धोरणे, व्यक्तिमत्व भारताचे तुकडे करत आहे, आर्थिक विषमता वाढत आहे, सामाजिक ध्रुवीकरण वाढत आहे आणि राजकीय अति-केंद्रीकरण वाढत आहे, म्हणून काँग्रेस हा प्रवास करत आहे.
दरम्यान, राहुल गांधीनी शनिवारी कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करत तुम्ही त्यांना त्यांचे हक्क का देत नाही असा थेट सवाल मोदींना केला आहे. यापूर्वी त्यांनी कर्नाटकातील गुंडलुपेट येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गमावलेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.