अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे. कारण राष्ट्रवादीच्या अकोला तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठवून दिले असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीच्या दरम्यान काय चर्चा झाली हहे जरी गुलदस्त्यात असले तरी ऐनवेळी राष्ट्रवादीला रामराम घालत वैभव पिचड भाजपमध्ये दाखल होणार आहेत अशी माहिती सूत्रं दिली आहे. तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गिरीश जाधव आणि युवक तालुका अध्यक्ष शंभू नेहे यांच्या सह इतरही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असणाऱ्या मधुकर पिचड यांच्या पुत्राने राष्ट्रवादी सोडणे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे मानले जाणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाणारी गळती कशी रोखायची यावर राष्ट्रवादी पक्ष नेतृत्व गांभीर्याने विचार करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मधुकर पिचड हे आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.