पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपकडून बक्षीस; दिले ‘हे’ पद

sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे (Nikhil Bhamare) या तरुणाची भाजपच्या आयटी सेलमध्ये (BJP IT Cell) सहसंयोजक पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे मूळ नाशिकचा असून त्याने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याने केलेल्या या पोस्टमुळे त्याच्यावर बारामती, पुणे, ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी या मुलाशी आपला काही संबंध नसल्याचा दावा भाजपने केला होता. परंतु आता हाच मुलगा भाजपसाठी काम करणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरे या तरुणाने थेट शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. निखिलने केलेल्या त्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यावेळी या मुलाचा भाजपशी संबंध असल्याचा दावा राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. या संबंधित काही पुरावे देखील आढळून आले होते. मात्र आपण निखिल भामरे अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसल्याचे भाजप पक्षाकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणी निखिल भामरेला 50 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.

त्यानंतर आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर भाजपने निखिल भामरेची आयटी सेलमध्ये सहसंयोजक पदासाठी नियुक्ती केली आहे. भाजपकडून नुकतीच सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये निखिल भामरेचे देखील नाव आहे. भाजपकडून राज्याचे 5 सहसंयोजक निवडण्यात आले आहेत यामध्येच निखिल भामरेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे निखिल भामरेला भाजपाने असे बक्षीस दिले आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

निखिल भामरेने पवारांविषयी काय पोस्ट केली होती?

सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरेने शरद पवारविषयी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने, ‘वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. बाराचाकाका माफी माग’ असे म्हणले होते. त्याची ही पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केली होती. त्यावेळी निखिलने केलेल्या पोस्टवर संताप व्यक्त करत त्याच्यावर दिंडोरी, पुणे,बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या परिसरातून सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर निखिल ला 50 दिवस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता याच निखिल ला भाजपने सहसंयोजक पदासाठी निवडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.