अहमदनगर प्रतिनिधी । आपण रडणार नाही, लढणार असं म्हणत आपण शिवसैनिक असून शिवसेनेने बडतर्फ केलं तरी बाळासाहेब ठाकरेंशी आपली बांधिलकी राहीलच असं सांगणाऱ्या निलेश लंके यांना पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात त्यांनी बुधवारी पारनेर-नगर मतदारसंघासाठी आपला उमेद्वारी अर्ज अपंग व्यक्ती, तालुक्यातील शहीद जवानांच्या वीरमाता यांच्यासोबत पारनेर तहसील कार्यालयात दाखल केला. सामाजिक कार्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघात शिवसेनेतर्फे कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली होती. आपल्या प्रतिष्ठानतर्फे त्यांनी अनेक ग्रामीण भागांत आपला जनसंपर्क वाढवला होता. मागील वर्षी विजय औटींच्या वाढदिवसावेळी त्यांच्याच गाडीवर झालेल्या दगडफेकीमुळे त्रस्त झालेल्या औटींनी लंके यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. तालुक्याच्या राजकारणात विजय औटींकडून दुर्लक्षित ठेवलं गेल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. आपल्याला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. पक्षापलीकडे जाऊन संघटनेतूनच चांगलं काम केल्यामुळे पारनेरमध्ये यंदा परिवर्तन घडणारच असा विश्वासही लंके यांनी यावेळी व्यक्त केला.
पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव,आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले. मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे हे जाणून घेऊन बेरोजगारीच्या मुद्यावर आम्ही सुपा येथे नोकरी मेळावा भरवला होता. या मेळाव्यात १२ हजार युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 5000 तरुणांच्या हाताला काम देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केलं असल्याचं लंके म्हणाले. यापुढे देखील तरुणांच्या रोजगारासाठी काम करत राहील असं आश्वासन निलेश लंके यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिले.