हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पावरून आज पुन्हा एकदा राडा झाला. बारसू गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे आज त्या ठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध करत त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली.
आम्हाला सुखाने जगू द्या, आमच्या गावात रिफायनरी प्रकल्प नकोच. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सर्व्हेक्षणही होऊ देणार नाही, असं म्हणत महिला आंदोलक आक्रमक झाल्या. त्यावर निलेश राणे यांनी त्यांना आश्वासन देत म्हंटल की, तुमचा विरोध देशात गेला आहे. तुम्ही शांत व्हा. आम्ही तुमचं म्हणणं सरकार समोर मांडू, आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो असे असं निलेश राणे यांनी म्हंटल पण तरीही महिला ऐकायला तयार नव्हता.
याचवेळी राणे समर्थकांकडून ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला, तेव्हा निलेश राणेंनी ग्रामस्थांची माफी मागितली. तुम्हांला जर कोणी शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत असं म्हणत हा वाद अधिक चिघळू नका असं आवाहन निलेश राणे यांनी केलं.