औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून जवळपास 9 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खुलताबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेचे शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. पहाटे पावनेदोन वाजेच्या सुमारास दोन कारमधून चोरटे आले. त्यांनी प्रथम सेंटरमधील सीसीटीव्हीच्या कँमेरावर स्प्रे मारला. त्यानंतर एटीएम मशीन मोठ्या शिताफीने फोडून पाच रँकमध्ये ठेवलेली 9 लाख 64 हजाराची रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने सायरनसुध्दा वाजले नाही हे विशेष. एसबीआय बँकेजवळ सुरक्षारक्षक असतो पंरतू चोरीची कुठलीही कुणकुण लागली नाही.
या परिसरात सर्व शासकिय कार्यालये असल्याने सांयकाळी सहानंतर या परिसरात शुकशुकाट असतो. त्यामुळेच चोरट्यांनी परिसराची रेकीकडून नियोजनबद्ध चोरी केल्याचे दिसून येत आहेत. घटनास्थळी खुलताबाद पोलीसांनी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज व इतर माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतले आहे. दरम्यान, एसबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी खुलताबाद येथे आले असून एटीएम मधील सायरन व इतर सुरक्षेला भेदून चोरी केल्याने नेमकी चोरी कशी केली याचा आढावा घेत आहे. घटनास्थळी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.