हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ मध्ये निपाह विषाणूने (Nipah Virus) तोंड वर काढले आहे. केरळ मधील एकूण 6 जणांना ह्याची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळातील आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूने संक्रमित केल्याचे आढळले आहे.ज्या ग्रामपंचायत मध्ये हा लागण झालेला रुग्ण सापडला आहे त्या ग्रामपंचायत मध्ये क्वारंटाईन झोन तयार करण्यात आलेला आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचे संक्रमण का होत आहे याचे कारण आणखी कळू शकलेले नाही.आरोग्य अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनूसार संक्रमित लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 950 लोक सामील आहेत. त्यातील 213 व्यक्ती हायरिस्क कॅटगरीत आहेत. या कॉन्टॅक्ट लीस्टमध्ये 287 आरोग्य अधिकारी देखील सामील आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी गुरुवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेला भेट देऊन निपा व्हायरसला रोखण्यासाठी उचलेल्या पावलांची माहीती घेतली आहे.
निपाह विषाणू काय आहे?
1999 मध्ये निपाह विषाणू मलेशिया आणि सिंगापूर मधील डुकरांमध्ये आणि लोकांमध्ये निपाह विषाणू आढळून आला. त्यावेळेसच्या उद्रेकात तब्बल 300 लोकांना निपाह लागण झाली व त्यातील 100 जणांचा मृत्यू झाला. याच उद्रेकात 10 लाख पेक्षा अधिक डुकरांचा देखील यात मृत्यू झाला. मूळ डुकरांमधून हा विषाणू मानवपर्यंत पोहचला आहे. तसेच फळे खाणारे वटवाघूळ हे निपाह विषाणूच्या उत्त्पती व संक्रमणाचे कारण समजले जाते. निपाह विषाणू हा पॅरामीक्सोव्हिरिडे (Paramyxoviridae) कुटुंबातील सदस्य आहे. तर हेनिपाव्हायरस(Henipavirus) genus अंतर्गत येतो. प्राण्यांमधून माणसामध्ये प्रसार होण्याची या विषाणू मध्ये क्षमता आहे. तसेच हा एका माणसातून दुसऱ्या माणसात संक्रमित होऊ शकतो . त्यामुळे निपाह विषाणू मुळे भविष्यात pandemic सारखी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.
निपाह विषाणूची काय आहेत लक्षणे :
निपाह विषाणूची लागण झालेल्या रुग्णात लक्षणे दिसायला 4-14 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 3-14 दिवसामध्ये ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो त्याचबरोबर आजार बळावत गेला की श्वासोच्छवासाच्या आजार, जसे की खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यात अडचण असे प्रकार होऊ शकतात . गंभीर स्वरूपात आजार गेल्या नंतर मेंदुवर सूज यायला लागते व त्यामुळे तंद्री, दिशाभूल आणि मानसिक गोंधळ अशी लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागतात. आजार अधिक गंभीर झाल्यास रुग्ण कोमात जाऊन दगावू शकतो. ICMR ( Indian council of medical reasearch ) ने सांगितल्या नुसार निपाह विषाणू मध्ये मृत्यू चे प्रमाण 40-70 % पर्यंत आहे. त्यामुळे यांचा धोका जास्त आहे.
निपाह विषाणू पासून कसे वाचू शकतो :
•नियमितपणे साबणाने आणि पाण्याने हात धुत राहा.
•आजारी वटवाघुळ किंवा डुकरांशी संपर्क टाळा
• जेथे वटवाघळांचा वावर असतो त्या ठिकाण टाळा
•वटवाघळांमुळे दूषित होऊ शकणारी उत्पादने खाणे किंवा पिणे टाळा, जसे की कच्च्या खजुराचा रस, कच्चे फळ किंवा जमिनीवर आढळणारे फळ
•निपाहची लागण झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे रक्त किंवा शरीरातील द्रवांशी संपर्क टाळा.
निपाह विषाणू लागण झाल्यावर काय आहेत उपचार पद्धती :
सध्या निपाह व्हायरस (NiV) संसर्गासाठी कोणतेही अधीकृत उपचार पद्धती उपलब्ध नाही. उपचार हे सहाय्यक काळजीपुरते मर्यादित आहे. उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीचा विकास केला जात आहे ज्यामध्ये m102.4 ही मोनोक्लोनल अँटीबॉडी पुढे आहे.
सुरुवातीच्या मलेशियन निपाह विषाणू उद्रेकात काही रुग्णांवर उपचार करण्यासाठी रिबाविरिन हे औषध वापरले जात होते, परंतु लोकांमध्ये त्याची प्रभावीता अस्पष्ट आहे.