देशातील सर्वात गरीब आमदार!! संपत्ती फक्त 1700 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात लोकशाही असून राजकीय नेतेमंडळीना समाजात आदराचे स्थान मिळते. देशातील राजकीय पुढारी सुद्धा सर्व बाजूनं आर्थिकरित्या सक्षम असल्याचे आपण जाणतोच. कांजीची कपडे, नेहरू शर्ट, जॅकेट, गाड्यांचा ताफा आणि सोबतीला अंगरक्षक असा नेत्यांचा थाट आपण बघतो. परंतु याच भारतात असाही एक आमदार आहे ज्यांची संपूर्ण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. होय, विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे. निर्मल कुमार धारा असे या सदर आमदाराचे नाव असून ते पश्चिम बंगाल मधून येतात.

गुरुवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने २८ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ४ हजार आमदारांच्या संपत्तीच्या विश्लेषणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून देशातील सर्वात जास्त धनवान आणि देशातील सर्वात गरीब आमदाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार हे सर्वाधिक श्रीमंत आमदार ठरले असून त्यांची संपत्ती १,४१३ कोटी रुपये आहे तर पश्चिम बंगालचे निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार ठरले असून त्यांच्याकडे अवघे १७०० रुपये आहेत.

कोण आहेत निर्मल कुमार धारा –

निर्मल कुमार धारा हे ३९ वर्षांचे असून ते पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2021 मध्ये निर्मल कुमार धारा यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सिंधूमध्ये विजय मिळवला होता. निर्मल कुमार धारा हे खरं तर पोस्ट ग्रॅज्युएट असून ते मुलांना शिकवतात. त्यांनी 2009 मध्ये बर्दवान विद्यापीठातून इंग्रजीमध्ये एमएची पदवी मिळवली. निर्मल कुमार धारा यांच्यावर कोणतेही फौजदारी खटले नाहीत किंवा कोणतेही दायित्व नाही. निर्मल कुमार धारा यांच्यानंतर सर्वात गरीब आमदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे अपक्ष आमदार मकरंद मुदुली आहेत. यांच्याकडे फक्त १५ हजार इतकीच संपत्ती आहे.