मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला, बांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहतूक केली बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती.मुंबईत वाऱ्याचा वेगही वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच जितामाता उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बुधवारी दुपारनंतर मुंबईत मोठा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-वांद्रे सी लिंक वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. दुपारनंतर समुद्राच्या मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सी लिंकवरील वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे.

भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातही प्राण्यांची काळजी घेण्यात आली आहे. उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. विशेषतः वाघ, बिबट्या अशा प्राण्यांना खुल्या जागेतून बंदिस्त जागेत हलविण्यात आले आहे. जेणेकरून झाडं पडल्यास त्यांना इजा होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

दुपारी मुंबईत पावसाचा जोर नसला तरी वेगाने वारे वाहत आहेत. सुमारे तीन तास ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. निसर्ग चक्रीवादळाबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौपाटीवर जाऊन तयारीचा आढावा घेतला. तर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात जाऊन आढावा घेतला आणि त्यानंतर वरळी आणि अन्य भागातही ते पाहणीसाठी बाहेर पडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”