…तर मग हिदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल; नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. पवारावरील हल्ल्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. कर्जतमधील पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असून आम्ही गप्प बसणार नाही. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मग हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.

आ. नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती कर्जतमध्ये घडली आहे. या ठिकाणी हिंदू समाजातील प्रतीक पवार या युवकावर हल्ला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरून लक्ष ठेऊन आहेत, असे राणे यांनी म्हंटले.

मविआचं सरकार आता रहिलेलं नाही – नितेश राणे

यावेळी आ. राणे यांनी कर्जत मधील घटनेवरून महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला. कर्जमधील पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिलेले नाही किंवा नवाब मलिकही नाहीत. त्यामुळे असले हल्ल्याचे व हिंदूंचा अपमान आता सहन केला जाणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात राहणाऱ्या प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पवार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावरील हल्ला हा जुन्या भांडणाच्या कारणावरून झाल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात येत आहे. मात्र, पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात आला आहे.