हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकारिणीची नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गडकरी यांनी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्याच्या व उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने एक सल्ला दिला आहे. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही. कुणाचीही-कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल”, असे गडकरी यांनी म्हंटले आहे.
यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्याकडून काहीही प्रयत्न केले जातात. लॉबिंग लावली जाते. मात्र, आता तसे चालणार नाही. ज्या उमेदवारात निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता आहे. अशा उमेदवारास व सर्वसामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी देण्याचा भाजपडून विचार केला जाणार जाणार आहे.
मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरातील जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भाजपच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीला अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बैठकीस भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मानकर, डॉ. मिलिंद माने संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मंत्री, संदीप जोशी आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर पालिकेत जागा किती?
नागपूर येथे मंत्री गडकरी यांनी भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक घेत पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. या ठिकाणी महापालिकेत एकूण 156 जागा आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 12 आणि महिलांसाठी 56 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 52 प्रभाग आहेत. नागपूरची लोकसंख्या 2447494 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 480759 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 188444 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. बी. राधाकृष्णन हे महापालिकेचे आयुक्त आहेत.