Wednesday, June 7, 2023

नितीशकुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ?? प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी जुलै-ऑगस्टमध्ये निवडणूक होणार आहे.यावेळी विरोधकांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर हे यासाठी फिल्डिंग लावत असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुढाकार घेत आहेत

वास्तविक, याच महिन्यात प्रशांत किशोर आणि केसीआर यांच्यात बैठक झाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांचीही भेट घेतली. तेव्हापासून नितीशकुमार हे विरोधकांच्या वतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

यासाठी नितीश कुमार यांचे मन वळविण्याचे काम स्वतः प्रशांत किशोर करत असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर बिगरभाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारीही प्रशांत किशोर यांच्यावर आहे. दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर राव नितीश कुमार यांच्या बाजूने टीएमसी, सपा, आरजेडी, जेडीयू या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते नितीश कुमार हे खूप तगडे उमेदवार असू शकतात. असे झाल्यास काँग्रेसलाही त्यांना पाठिंबा देणे भाग पडू शकते.