“महिलांची बदनामी करणे निंदनीय”; राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियान प्रकरणी तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास पाठविला आहे. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट केले. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. समाज माध्यमासमोर महिलांची बदनामी करणे निंदनीय, लोक भान विसरत चाललेत का असा प्रश्न पडतो,” असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.

रुपाली चाकणकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. मालवणी पोलिसांचा अहवाल आल्यावर त्यात काय तथ्य आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्या अहवालात किती तथ्य आहे हे पाहून याची चाचपणी केली जाईल. महिला आयोग कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही, असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.