नितीशकुमार की पलटूसम्राट?? पहा आत्तापर्यंतच्या राजकीय कोलांट्याउड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडी आणि काँग्रेस सोबत सत्तास्थापन केली. नितीशकुमार यांच्या धक्कातंत्रामुळे भाजपला आपली सत्ता गमावली लागली. परंतू आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर नितीशकुमार यांनी अनेक वेळा आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत.

नितीशकुमार यांनी 1994मध्ये आपले जुने सहकारी लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जनता दलमधून बाहेर पडून नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली होती. त्यावेळच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते.

बलाढ्य लालूप्रसाद यादव यांच्यावर मात करण्यासाठी नितीश कुमार यांनी 1996 मध्ये भाजपशी मैत्री केली. भाजप आणि समता पार्टीची युती 17 वर्ष चालली. 2003मध्ये समता पार्टीचं रुपांतर जनतादल युनायटेडमध्ये झालं. मात्र, तेव्हाही जेडीयू ने भाजपसोबतची मैत्री निभावली.

2012 ला एनडीएचे घटक पक्ष असूनही राष्ट्रपती निवडणुकीत प्रणब मुखर्जी यांना मत दिले होते. त्यानंतर जेव्हा 2013 मध्ये जेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले त्यावेळी नीतीश कुमार यांनी 17 वर्षे जुनी युती अचानकपणे तोडली होती. आणि पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यासोबत घरोबा केला.

नीतीश कुमार यांनी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस, राजद व अन्य पक्षांची महाआघाडी स्थापन केली होती व निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत आरजेडीला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतरही लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं.

मात्र त्यानंतर हे सरकारही जास्त काळ चाललं नाही. 2 वर्षात आरजेडी आणि जेडीयु यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र अवघ्या 15 तासात भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.