देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, पण केंद्रानं समूह संसर्गाची शक्यता नाकारली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात विशेषकरून मुंबई आणि दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्र सरकारने देशात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे सांगितलं आहे. ‘भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही,’ अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी लॉकडाउन लागू केल्याने कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचं अधोरेखित केलं. ‘शहरी भागात करोनाचा फैलाव थोडा जास्त झाला आहे. पण लॉकडाउन करत आपण जी पावलं उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळालं,’ असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

राज्यांनी सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असून त्यात शिथीलता आणली जाऊ शकत नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांनी पाळत ठेवण्यासोबतच नव्या योजना आखण्याची गरज असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.’आज देशात रिकव्हरी रेट ४९.२१ टक्के आहे. उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या अक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. ही दिलासा देणारी गोष्ट आहे’ असं आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, देशात कोरोनासंबंधी रोज नवे रेकॉर्ड नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांत कोरोनामुळे ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक ९ हजार ९९६ रुग्णांची नोंद झाली. तसेच १ जूनपासून १० जूनपर्यंत सुमारे ९० हजार कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे वृत्त समोर आलं आहे. तर नुकतेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाली असं सांगितलं. तसेच जून अखेरपर्यंत दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ५ लाखापर्यंत पोहचेल असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment