कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी आज सोमवार दि. 6 डिसेंबरपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. कराडला शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशद्वारावरच लस नाही तर प्रवेश नाही असे फलक लावले आहेत.
कराडला आज प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात लसीचे दोन डोस नाहीत तर प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्यांना बाहेरच ताटकळत बसावे लागले. शहरातील नगरपरिषद कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत, तहसीलदार कचेरी या ठिकाणी आता लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे, त्यानुसार प्रशासनाने याबाबत प्रवेशद्वारावरच सूचना लावली असून लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.
कराड येथील नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावरच लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी सूचना लावण्यात आली. लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच नगरपालिकेत नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. त्याच प्रमाणे येथील तहसीलदार कचेरीत ही प्रवेशद्वारावर सूचना लावली असून लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहून नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयात सोडले जात आहे. ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांची मात्र आज चांगलीच पंचाईत झाली आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र नसल्याने अनेकांना कार्यालयाच्या बाहेरच ताटकळत बसावे लागले आहे.