सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरी देखील अद्याप बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उस उभा असून या उसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चालू असलेले गाळप थांबवले जावू नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच कार्यक्षेत्रातील आणि अतिरिक्त कार्यक्षेत्रातील उसाचा शेवटचा फड तोडल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही यासाठी आवश्यक ते सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन उस उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार नाही अश्या सक्त सूचना जिल्ह्यातील साखर कारखान्यांना द्याव्यात अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
शेतात अनेक कारणांमुळे ऊस उभा असताना जर कारखान्यांचे गळीत संपुष्टात आणले गेले तर शेतकऱ्यांचे अनेक प्रकारांनी नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी उस उभा असलेल्या क्षेत्राचे गाळप सुरु असलेल्या कारखान्यांना उदिष्ट देऊन उसाचा शेवटचा फड तुटे पर्यंत गाळप सुरु राहीले पाहीजे तरच शेतकऱ्यांना हिताचे ठरणार आहे. याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा झाली अस त्यांनी म्हंटल.
यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तातडीने सर्व कारख्यान्यांना लेखी आदेश देऊन उस तोडणी झाली नाही किंवा गाळप झाले नाही म्हणून उस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व फडांची तोड झाल्याशिवाय कारखाना गाळप बंद न करण्याचे आदेश दिले.