नवी दिल्ली । जर तुमची ट्रेन देखील कॅन्सल झाली असेल तर तिकिटाचे पैसे परत मिळविण्यासाठी आता काळजी करण्याची गरज नाही. तुमचे सर्व पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात परत येतील. यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही किंवा Ticket cancellation अथवा TDR फाइल करावा लागणार नाही. रेल्वेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ट्रेन कॅन्सल झाल्यानंतर एका प्रवाशाने ट्विट करून रेल्वेला विचारले होते की, रिफंडसाठी TDR फाइल करावा लागेल का? यावर रेल्वेने ट्विट करून माहिती दिली. कामकाजाच्या कारणास्तव कॅन्सल केलेली ट्रेन कधीही सुरू केली जाऊ शकते, असे रेल्वेने सांगितले. http://indianrail.gov.in/enquiry/PnrEnquiry.html या रेल्वे साइटवर तुमच्या ट्रेनचे स्टेट्स तपासत राहा किंवा ट्रेन इन्क्वायरी नंबर 139 वर कॉल करून जाणून घ्या.
शुद्ध शाकाहारी अन्न
ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक वेळा प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवणाची समस्या भेडसावते. तुम्हालाही प्रवासादरम्यान स्वच्छ आणि शुद्ध शाकाहारी जेवण खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना स्वच्छ जेवण मिळावे यासाठी रेल्वेने नवीन सुविधा सुरू केली आहे. IRCTC सर्व ट्रेनमध्ये ही सुविधा देण्यासाठी सात्विक काउंसिल ऑफ इंडिया सोबत काम करत आहे.
IRCTC सर्टिफिकेट मिळवू शकते
रेल्वेच्या या हालचालीमुळे IRCTC लाही लवकरच सर्टिफिकेट मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रेल्वे विभागाने काही गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. वंदे भारत कटरासह विविध धार्मिक स्थळांशी जोडलेल्या गाड्यांमध्ये सात्विक आणि शुद्ध शाकाहारी जेवण दिले जात आहे.
गार्डच्या पदाचे नाव बदलेल
ट्रेनमधील गार्डच्या पदाच्या नावात बदल होणार आहे. त्यांना आता गार्ड नाही तर ट्रेन मॅनेजर असे म्हटले जाईल. 2004 पासून पदाचे नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. त्याबाबतचा आदेशही या आठवड्यात काढण्यात येणार आहे.
पदाचे नाव बदलण्याचे आदेश या आठवड्यात जारी केले जातील
उत्तर मध्य रेल्वे मेन्स युनियनचे सरचिटणीस आरडी यादव म्हणाले की,”गार्डच्या पदाचे नाव बदलून ट्रेन मॅनेजर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. 18 नोव्हेंबर रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत पदाचे नाव बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश या आठवड्यात काढण्यात येणार आहे. आतापर्यंत, ट्रेनच्या मागील डब्यात कंदील आणि हिरवा झेंडा अशी रेल्वे गार्डची ओळख होती मात्र आता ते एक प्रकारे संपूर्ण ट्रेनचे मॅनेजमेंट करतील.
रेल्वे ड्रायव्हरचा शब्द बदलून लोको पायलट झाल्यापासून कर्मचाऱ्यांनी गार्ड शब्दाच्या नावावर अनेकदा आक्षेप घेतला होता आणि तो बदलण्याची जोरदार मागणी युनियनकडून करण्यात आली होती. ही मागणी अखेर प्रदीर्घ काळानंतर मान्य करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून याद्वारे रेल्वे गार्डना आता त्यांच्या कामानुसार योग्य नावाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले. उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी सांगितले की, अद्याप असा कोणताही आदेश नाही.