रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता ‘या’ रेल्वेंमध्ये जनरल तिकिटावर करता येणार प्रवास

औरंगाबाद – कोरोना काळात दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत अखेर काही रेल्वेतील बोगी अनारक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नंदिग्राम एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस आदींचा समावेश आहे. त्यामुळे या रेल्वेतून आता जनरल तिकीटावर ही प्रवास करता येणार आहे.‌

दमरे ने दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारीपासून मराठवाडा एक्सप्रेस मध्ये 8 बोगी, तपोवन एक्सप्रेस मध्ये 4 बोगी, नंदिग्राम मध्ये 2, अजिंठा एक्सप्रेस मध्ये 2 बोगी अनारक्षित राहणार आहे. तर तिरुपती साईनगर शिर्डी या साप्ताहिक एक्सप्रेस मध्ये 25 जानेवारी पासून 6 बोगी अनारक्षित राहणार आहेत. तसेच राज्यराणी एक्सप्रेस मध्येही 1 फेब्रुवारीपासून 4 बोगी अनारक्षित राहतील.

काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या स्पेशल दर्जा काढून आता पूर्वीप्रमाणे नियमित रेल्वेगाड्या धावत आहेत. परंतु जनरल तिकीट विक्री बंद असल्याने मराठवाडा, तपोवन, नंदिग्राम या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यातून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता येत नव्हता. मात्र, आता जनरल तिकिटाची सुविधा उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.