अहो आश्चर्यम् ! नगरपंचायतीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळाले चक्क शून्य मत

औरंगाबाद – काल राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक जण एका मताने निवडून आले, तर अनेक उमेदवारांना एका मताने पराभव पत्करावा लागला. एवढेच काय तर मोठ्या राजकीय नेत्यांच्या पॅनलचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याचे आपण पाहिले. आता याहीपेक्षा कहर म्हणजे बीडच्या शिरूर नगरपंचायतमध्ये चक्क काँग्रेसच्या एका उमेदवाराला शून्य मत मिळालं आहे. फकीर शब्बीर बाबू असं या उमेदवाराचं नाव आहे.

बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था तशी जेमतेमच आहे. जिल्ह्यातील एकमेव केज नगरपंचायत ही काँग्रेसकडे होती. मात्र, काल लागलेल्या निकालात काँग्रेस याठिकाणी तिसऱ्या नंबरचा पक्ष बनला आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतसाठी मतदान झाले. याच्या मतमोजणी निकालामध्ये शिरूर नगरपंचायत गाजली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. यामुळे शिरूर नगर पंचायत ही भाजपाच्या ताब्यात गेली. पण, याठिकाणी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे फकीर शब्बीर बाबू या उमेदवाराला मात्र एकही मत न पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

…म्हणून स्वतःही मत देऊ शकले नाहीत!
बहात्तर वर्षाच्या फकीर शब्बीर बाबू यांना काँग्रेसने शिरूर नगर पंचायतसाठी उमेदवारी दिली. फकीर यांनी शिरूर नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवली. या वार्डमध्ये एकूण 198 जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावला. यापैकी भाजपाच्या गणेश भांडेकर यांना 155 मतं पडली आणि ते या वॉर्डातून विजय झाले. त्यानंतर दोन नंबरची मतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शांतीलाल चोरडिया यांना या वॉर्डामध्ये 43 मत मिळाली. फकीर शब्बीर बाबू हे काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवार होते. त्यांना मात्र एकसुद्धा मत पडलं नाही. स्वतः फकीर शब्बीर बाबू यांचा मतदान या वार्डमध्ये नव्हते. त्यामुळे ते देखील स्वतःला मतदान करू शकले नाहीत. यामुळे सध्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळालेले शून्य मत हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.