मुंबई । मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे. रुग्णांनी आता थेट रुग्णालयांत न जाता १९१६ या क्रमांकावर कॉल करावा. तिथे डॅशबोर्डवर नोंद झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने १ ते २ तासांत बेड उपलब्ध करून दिले जात आहेत, असं महापालिकेनं म्हटलं आहे.
कोरोना रुग्णांसाठी जास्तित जास्त बेड तयार केले जात असून त्यापैकी ५० टक्के बेड ऑक्सिजनचे असतील यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच लक्षणं नसलेल्या कोविड रुग्णांनी घरी वेगळी व्यवस्था असेल तर घरीच राहावे. त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ज्यांच्या घरी व्यवस्था आहे, त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत.
दरम्यान, मुंबईत डॉक्टर आणि अन्य प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यासाठी कोविड योद्धा भरती केली जाणार आहे. याशिवाय केरळमधून डॉक्टर आणि नर्स आणण्याचाही विचार राज्य सरकारने केला आहे. याशिवाय राज्याच्या ग्रीन झोनमधील डॉक्टरांनाही मुंबईत आणण्यासाठी तयारी महापालिकेने सुरु केली आहे. तसेच डॉक्टरांची भरतीही सुरु केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”