औरंगाबाद | संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठा, शाळा – कॉलेज, कंपनी, दुकाने सर्व बंद होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना महापालिकेने रविवारचा बाजार वगळून सर्व आठवडी बाजार यांना परवानगी दिली आहे.
सोमवारी पाच महिन्यानंतर आठवडी बाजार भरला त्यावेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. परंतु हळूहळू बाजारपेठांमध्ये बाजारासाठी ग्राहक येतील अशी विक्रेत्यांची आशा आहे. याविषयी उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील शुक्रवारचा बाजार भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असल्यामुळे जाफर गेट येथील रविवारचा बाजार भरण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
गुरुवारी छावणी भागात बाजार भरतो त्याबद्दल छावणी परिषद निर्णय घेईल. आता रविवारच्या आठवडी बाजाराला कधी परवानगी मिळते याकडे नागरिकांचे आणि विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे. सोमवारी शहानुरमिया दर्गा परिसरात श्री हरी पॅव्हेलियन मोकळ्या जागेत बाजार भरला होता. परंतु लोकलमध्ये या मोकळ्या जागेत खाजगी बसेस उभ्या राहत होत्या. आता बाजार भरत असल्यामुळे या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी वाहतूक खोळंबली होती.