हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वादाचा विषय ठरत असतानाच आता गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनें’तर्गत गरिबांना पाच किलो मोफत धान्य पुरवलं जातं आहे. याच दरम्यान, भाजपाशासित राज्यांत या धान्यावरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश पक्षनेत्यांकडून जारी करण्यात आलेत.
भाजपशासित राज्यांत सर्व रेशनिंग दुकानांवर पाच किलो गहू किंवा तांदूळ वितरणाचा बॅनर लावण्यात यावा. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असायला हवा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बॅनरची डिझाईन, धान्याच्या बॅगची डिझाईनही भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून निश्चित करण्यात आलीय.
नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. गैरभाजप शासित राज्यातही भाजपकडून गरिबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. या धान्यांच्या पाकिटावरही भाजपचे चिन्ह असणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून याचा प्रचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात बॅनर देखील लावण्यात येणार असून या बॅनरवर मुख्यमंत्र्यांऐवजी तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्याचा फोटो लावण्यात येणार आहे.