आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या; थरकाप उडवणारी घटना

bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड – बस स्थानकाच्या परिसरात संपामुळे उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये दोरीने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास बीड बसस्थानकात उघडकीला आली. निवृत्ती भागुजी आबुज (वय 70, रा. बाळराजे कॉलनी, शाहूनगर, बीड) अशी आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे.

स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. दुपारी दीडच्या सुमारास रिकामी असलेल्या बसमध्ये (क्र. एमएच- 14, बीटी 2237) कोणीतरी इसम लटकेला निदर्शनास आल्यानंतर सफाई कामगार व नागरिकांनी बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राठोड व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. तर विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, आगारप्रमुख निलेश पवार, स्थानक प्रमुख किरण बनसोडे घटनास्थली पोहचले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, काही वेळाने मयत इसमाचे नातेवाईक रूग्णालय व शिवाजीनगर ठाण्यात पोहचले. याप्रकरणी जबाब नोंदविण्याचे काम सुरू हाेते. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

प्रवासी सेवा सुरळीत –
बस स्थानक परिसरात ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळ व बसभोवती गर्दी जमा झाली होती. दरम्यान स्थानकातून सुटणाऱ्या बसची प्रवासी सेवा सुरळीत होती.