औरंगाबाद – ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस आपले हातपाय पसरताना दिसतो आहे. देशात शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन आपले हातपाय पसरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर यानंतर आता लातूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. लातूर जिल्ह्यात 51 नागरिक परदेशातून आले होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत. तर उर्वरित 47 नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत. त्यापैकी ४४ लोकांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक जण व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आला होता. परदेशातून आलेला व्यक्ती करोनाबाधित असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती.
या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे जीनोम सिक्वेनसिंग करण्यासाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठवण्यात आले. सोमवारी रिपोर्टमध्ये तो व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचं समोर आलं. या व्यक्तीवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. लक्षणे सौम्य आहेत मात्र प्रशासन सर्व काळजी घेत आहे. ओमायक्रॉन बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना विलगीकरणातही ठेवण्यात येईल.