पाटना : वृत्तसंस्था – भागलपूरमधील तातरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आपल्या वाढदिवशी एका छोट्याशा कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती मृत व्यक्तीच्या पत्नीने दिली आहे. या मृत व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार असे आहे. यानंतर मृत व्यक्तीच्या भावाने शैलेंद्रच्या पत्नीवर हत्येचा आरोप केला आहे.
शैलेंद्र रात्री उशिरा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करून परतले होते. जेवणाबद्दल विचारलं असता ते नाही म्हणाले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि ते आपल्या खोलीत निघून गेले. मी दोन्ही मुलींसोबत डायनिंग हॉलमध्येच झोपले. सकाळी थंडी वाजायला लागली म्हणून मी बेडरूममध्ये गेले तर शैलेंद्रने गळफास घेऊन आत्महत्या केली होती अशी माहिती शैलेंद्रची पत्नी नेहा निगम हिने पोलिसांना दिली.
यानंतर नेहाने याची माहिती शैंलेंद्रच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर शैलेंद्रला रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मृत शैलेंद्रचा मोठा भाऊ विजय रजक याने भावाच्या पत्नीचे जवळच राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. तिने भावाची संपत्ती हडपण्यासाठी भावाची हत्या करून आत्महत्येचं स्वरुप दिले असा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.