हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन सणासुदीच्या काळात सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्राशन करून तरुणाने आपले जीवन संपवले आहे. ज्यामुळे नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे. दाजीबा रामदास शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी दाजीबा शिंदे याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यात “मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे” असा मजकूर लिहला होता.
सध्या संपूर्ण राज्यात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अशा काळातच दाजीबा रामदास शिंदे या 25 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे नांदेडमधील मरळक गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मरळक गावात 11 नोव्हेंबर रोजी घडली आहे. दाजीबा रामदास शिंदे याने मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. तो सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. परंतु आरक्षण मिळत नसल्यामुळे दाजीबा काही करू शकला नाही. यात त्याच्या वडिलांनी दीड एकर शेती विकली होती. या सगळ्या गोष्टींमुळे नैराश्यात जाऊन दाजीबा याने आत्म्हत्या केली.
आत्महत्या पूर्वी दाजीबा याने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. ज्यात त्याने आपल्या मृत्यूचे कारण मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याचे सांगितले आहे. या सर्व घटनेनंतर शिंदे कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितले आहे. दरम्यान, नांदेड पोलिसांनी दाजीबा याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. तसेच, त्याच्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, ऐन दिवाळीत शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.