औरंगाबाद – गुढीपाडवा सणासाठी बहिणी, भाचे सर्व कुटुंब गावी आले होते. दरम्यान वडिलांनी मित्रांसह दारू पिल्याने राग अनावर झाल्याने पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी घन घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता चिंचोली गावात घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नानासाहेब घुगे (27) असे त्या मारेकरी मुलाचे नाव असून त्याला चिकलठाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कडूबा भावराव घुगे (65, रा. चिंचोली, ता.जि. औरंगाबाद) असे मृत वडीलांचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी संगीताबाई घुगे (55) यांच्या फिर्यादीनुसार मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मुली, नातवंडे असे सर्व कुटुंबीय घरी आले होते. सकाळी सर्वांनी घरावर गुढी उभारली. सर्वांनी सोबत जेवण केल्यावर दुपारी साडेतीनच्या दरम्यान गावातून जाऊन येतो म्हणून कडूबा हे घराबाहेर पडले. ते संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान दारू पिऊन घरी आले. दरम्यान धाकटा मुलगा नानासाहेब याला कळताच त्याने तुम्ही दारू पिऊन का आले? तुमच्या मित्रांची संगत सोडा, असे म्हणत कडूबा यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. त्यानंतर कडूबा हे घराच्या बाहेरील बाजेवर झोपी गेले. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नानासाहेब घरी आला व ‘आता तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत वडिलांच्या डोक्यात लोखंडी घनाने प्रहार केला. हा प्रहार एवढ्या जोराचा होता की, कडूबा हे रक्तबंबाळ होऊन जागेवरच बेशुद्ध झाले.
विशेष म्हणजे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या थोरल्या भावाला देखील नानासाहेब याने घनाने बेदम मारहाण करीत पोबारा केला. दोन्ही जखमींना गावकऱ्यांनी तातडीने रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान शनिवारी रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान कडूबा यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी मुलाला शनिवारी अटक केली.