मुंबई । आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय पुजेसाठी पंढरपुरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कारने मुंबईहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीनिमित्ताने वारी रद्द करण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रूक्मिणी यांची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी पहाटे २.३० वाजता ही शासकीय पूजा होणार आहे. यासाठी आजच मुख्यमंत्री आणि कुटुंबिय पंढरपूरला रवाना झाले आहेत. वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपुरला पूजेकरता जाणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सोमवारी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी फक्त मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय आणि मानाचे वारकरी जे पूजा करणारे आहेत त्यांनाच फक्त गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
यंदा विठ्ठल ज्ञानदेव बडे हे मानाचे वारकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल-रखुमाईची पूजा करणार आहेत. बडे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळचे रहिवाशी आहेत. यंदा दर्शन रांग नसल्याने मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. त्यात विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”