एकीकडे महागाई असताना दुसरीकडे सर्वाधिक सोने खरेदीत मध्यमवर्गच अग्रेसर

नवी दिल्ली । कोरोना महामारीतून देश आटा कुठे सावरत आहे तोच महागाईनेही ‘महामारी’चे रूप धारण केले आहे. देशात सर्वत्र वाढत्या किंमतीमुळे लोकं हैराण झाले असतानाच एका रिपोर्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत असल्याचे सांगितले जाते, मात्र इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरच्या (IGPC) रिपोर्टनुसार, देशातील सर्वाधिक सोने खरेदीही मध्यमवर्ग करत आहे. म्हणजेच एकीकडे हा वर्ग महागाईच्या प्रभावाने सर्वाधिक त्रस्त झालेला दिसतो, तर दुसरीकडे सोन्याची बंपर खरेदीही करत आहे. IGPC ने म्हटले आहे की,”देशातील मध्यमवर्ग फिजिकल गोल्डची सर्वाधिक खरेदी करत आहे.”

श्रीमंतांना डिजिटल गोल्ड आवडते
IGPC ने Gold and Gold Markets 2022 च्या रिपोर्ट मध्ये असे सांगितले गेले आहे की,” देशातील श्रीमंत वर्ग किंवा जास्त उत्पन्न असलेली लोकं डिजिटल किंवा पेपर फॉर्मेटमध्ये सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दरडोई जास्त सोने खरेदी करण्याबाबत बोलायचे झाले तर त्यात उच्च वर्ग किंवा उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर एकूण खरेदीचा आकडा पाहिला तर त्यात मध्यमवर्ग आघाडीवर राहतो.

10 लाखांपर्यंत कमाई करणारे खरेदी करत आहेत 56 टक्के सोने
या रिपोर्ट मध्ये असेही म्हटले गेले आहे की, असा वर्ग ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2-10 लाख रुपये आहे, ते देखील सर्वाधिक सोने खरेदी करतात. अशा श्रेणीतील लोकं एकूण सोन्याच्या 56 टक्के खरेदी करतात. याचे कारण इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत हा सर्वात सुरक्षित मानला जातो.

10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गातील लोकं भांडवली नफ्यासाठी अतिरिक्त भांडवल गुंतवतात. सोने, एफडीपेक्षा स्टॉक मार्केट, डेरिव्हेटिव्ह आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास तो प्राधान्य देतो. देशभरातील सुमारे 40 हजार लोकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

GST किंवा नोटाबंदीचा कोणताही परिणाम नाही
नोटाबंदी किंवा GST लागू करण्यासारख्या मोठ्या निर्णयांचाही देशातील सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा या रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील 74 टक्के उच्च उत्पन्न असलेल्या लोकांनी सोने खरेदी केले आहे. यादरम्यान, इतर वस्तूंच्या खरेदीवर मोठा प्रभाव दिसून आला, मात्र सोन्याची मागणी सतत वाढत गेली.

लग्नसमारंभात सोन्याची जास्तीत जास्त खरेदी
भारतीय ग्राहक लग्नसमारंभात सर्वाधिक सोने खरेदी करतात. या रिपोर्ट मध्ये असेही म्हटले गेले आहे की, एकूण सोन्यापैकी 65-70 टक्के सोने सण किंवा लग्नाच्या निमित्ताने खरेदी केले जाते तर इतर प्रसंगी केवळ 30-35 टक्केच खरेदी केली जाते. 41 टक्के लोकं केवळ लग्नसोहळ्याच्या निमित्ताने सोने खरेदी करतात, तर 31 टक्के लोकं कोणत्याही विशेष प्रसंगाशिवाय सोने खरेदी करतात