दुसऱ्या दिवशीही एसटीच्या वतीने खासगी शिवशाही रस्त्यावर

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून खासगी शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरवली आहे. शनिवारी मात्र नऊ शिवशाही बस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. शुक्रवारी दोन बस धावल्या होत्या. या दोन दिवसात एक लाख 77 हजारांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पडले आहे. दरम्यान, शनिवारी 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सहा दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. मात्र, शुक्रवारी पुणे मार्गावर दोन शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्या होत्या. शनिवारी पुणे शहरासाठी नऊ शिवशाही बस चालवण्यात आल्या. या शिवशाहीची बुकिंगची व्यवस्था कर्णपुरा मैदान आणि वाळूज रोडवर करण्यात आली आहे. शनिवारी पुण्यासाठी रवाना करण्यात आलेल्या नऊही शिवशाही बस पूर्णक्षमतेने धावल्या.

दरम्यान, जिल्हाभरातील आगारातील लालपरी मात्र अद्यापपर्यंत आगाराच्या बाहेर पडली नाही. कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचा बडगा उगारला आहे. मागील तीन दिवसांत तीस जणांना निलंबित केले होते. शुक्रवारी निलंबनाची कारवाई झाली नव्हती. मात्र, शनिवारी गंगापूर, सोयगाव आणि विभागीय मध्यवर्ती कार्यशाळेतील अशा एकूण 19 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

You might also like