सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातल्या मेढा पोलीस ठाण्यात एप्रिल आणि मे 2017 रोजी एका 14 वर्षीय युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अशोक शंकर माने (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक करीत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.के.पटणी यांनी आरोपीस दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक शंकर माने (वय 25) याने एका पीडितेच्या घरात रात्रीच्या वेळी जबरदस्ती प्रवेश करून तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. तसेच याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीहि संबंधित पीडितेला दिली होती. अत्याचारानंतर संबंधितयुवती गर्भवती राहिली होती. यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपी अशोक माने याच्या विरोधात मेढा पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर अशोक माने विरोधात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप सादर करत 13 साक्षीदार तपासले.
या प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए.के.पटनी यांच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य साथीदारांच्या साक्षीवरून आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांनी अशोक शंकर माने या (वय 25) याला दोषी ठरवले. तसेच त्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.