कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयनानगरमध्ये जुलै महिन्यात भूसल्खनामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावातील आपत्तीग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी कोयनानगर येथे बनविण्यात आलेल्या 150 निवारागृहात आपत्तीग्रस्तांना खोल्या देवून त्यांचे तात्पुरते पुनर्वसनाचा दुसरा टप्पा आज दि. 8 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे.
कोयना विभागात 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसाने विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांवर भूसल्खनात आपत्तीचा डोंगर कोसळला होता. या आपत्तीग्रस्त गावातील ग्रामस्थांचे तीन टप्प्यात पुनर्वसन करण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपत्तीग्रस्त गावानां कोयनानगर येथील मराठी व हायस्कूल येथे तर ढोकावळे येथील ग्रामस्थांना न्यु इंग्लिश स्कुल चाफेर-मिरगाव येथे स्थलांतरीत केले होते. या सर्व आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना कोयनानगर येथील 150 खोल्या मध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्याचे जाहिर केले होते.
आपत्तीग्रस्तांना आज सन्मानाने या खोल्यांत घालविण्यासाठी खोल्यांच्या चाव्या देण्यासाठी स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन समिती सदस्य जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी सुनील गाढे हे येणार आहेत.