एकच चर्चा : साताऱ्यात कचरा डेपोवर मिसाईल हल्ला?

सातारा प्रतिनिधी | महेश पवार

सातारा तालुक्यातील सोनगाव कचरा डेपोवर कुणी जैविक मिसाईल हल्ला केला याची चर्चा जोरदार रंगली. सातारा शहराचा कचरा गोळा करून सोनगाव येथील कचरा डेपो येथे टाकला जातो. परंतु याच कचरा डेपोला आज आग लागून संपुर्ण परिसरात धुराचे लोट वाहताना दिसत होते. यावेळी गाडी चालविणे सुध्दा अवघड होत असल्याने थांबलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती की रशियाने काय चुकुन युक्रेन समजून इथे मिसाईल हल्ला केला काय ? असा प्रश्न उपरोधाने उपस्थित केला जात होता.

परंतु हा कचरा डेपो इतक्या मोठ्या प्रमाणात पेटला कसा? की पेटवला आणि पेटल्यामुळे होणाऱ्या प्रदुषणास कोण जबाबदार? संबंधितांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, परळी सज्जनगड परिसरातील वाघवाडी जवळ वनव्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र जळून नष्ट झाली. वारंवार मोठ्या प्रमाणावर आगीचे प्रकार घडताना दिसतात लाखो रुपये खर्चून लावलेली झाडे काही वेळात जळून खाक होतानाचे चित्र दिसते. तरीही वनविभाग मूग गिळुन गप्प का? असा पर्यावरण प्रेमी सवाल करत आहेत.

सोनगाव येथील कचरा डेपोतील कचरा पेटल्याने रशिया- युक्रेन युध्द परिस्थितीत ज्याप्रमाणे हल्ला झाल्यानंतर धुराचे लोट पहायला मिळत आहेत. तसेच धुराचे लोट आज या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सातारकरांना पहायला मिळाले. या जळालेल्या कचऱ्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने पर्यावरण प्रेमीच्यांतून नाराजी व्यक्त केली.