औरंगाबाद – प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद घेऊन एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे मार्गावर खाजगी शिवशाहीची सेवा सुरु केली आहे. याच खाजगी चालकांचा मनमानीचा त्रास शनिवारी पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला. यामध्ये एक चालक दारू पिऊन होता, दुसऱ्या चालकाने गाडीला ठोकले तर तिसर्या चालकाला रस्ताच माहीत नसल्याने पुणे दर्शन करत प्रवाशांना औरंगाबादेत पोहोचण्यास दहा तासांचा खडतर प्रवास करावा लागला. दुपारी साडेतीन वाजता शिवशाहीत बसलेल्या प्रवाशांनी रात्री साडेबारा वाजता औरंगाबादेत पोचल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. परंतु प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाच्यावतीने औरंगाबाद पुणे मार्गावर खासगी शिवशाही चालवण्यात येत आहे. परंतु, या शिवशाहीच्या मनमानी व बेताल वागण्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असाच प्रकार शनिवारी समोर आला. केवळ चार ते पाच तासांचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना दहा तास प्रवास करावा लागला तो ही वेगवेगळ्या तीन गाड्यांतून. हे झाले असे की शिवशाही (क्र. 3151) ही गाडी दुपारी साडेतीन वाजता पुणे येथून औरंगाबाद ला निघणार होती. औरंगाबादचे 40 प्रवासी त्या गाडीत बसले चार वाजले तरी गाडी जागची हलेना म्हणून प्रवाशांनी ओरड केली. तेव्हा या गाडीचा चालक दारू पिऊन तेथेच आडवा झाल्याचे समोर आले. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी धावपळ करत औरंगाबादच्या प्रवाशांसाठी तात्काळ 2898 क्रमांकाची शिवशाही सेवेत दिली. गाडीने शिवाजीनगर सोडले आणि औरंगाबादच्या रस्त्याला लागण्याआधीच दोन गाड्यांना ठोकले नंतर ही गाडी तेथेच सोडून तिसरी गाडी प्रवाशांसाठी देण्यात आली.
नंतर औरंगाबादच्या प्रवाशांसाठी 359 क्रमांकाची तिसरी शिवशाही देण्यात आली. मागील दोन गाड्यांचा त्रास कमी म्हणून की काय, तिसऱ्या शिवशाहीच्या चालकाला तर औरंगाबाद चा रस्ता सापडेना. सुमारे एक ते दीड तास पुणे दर्शन झाल्यानंतर ही गाडी औरंगाबाद रोडला लागली व रात्री साडेबारा वाजता औरंगाबादेत पोहोचली गाडीतून खाली उतरताच सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.