सातारा | सातारा तालुक्यातील तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे येथील विकास सेवा सोसायटी नं. 1 वर अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. नागठाणे विकास सेवा सोसायटी नं. 1 ची यंदाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. निवडणूक लागल्यानंतर या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलला पारंपारिक चौंडेश्वरी ग्रामविकास पैनेल बरोबरच माजी सरपंच विष्णू साळुंखे-पाटील यांच्या नागठाणे ग्रामविकास पैनेल असा मुकाबला होणार अशी अटकळ येथील ग्रामस्थांनी बांधली होती. मात्र ऐन वेळी चौंडेश्वरी ग्रामविकास पॅनेलने निवडणुकीतुन माघार घेतली. यामुळे अजिंक्य पॅनेलची लढत नवीनच उदयास आलेल्या नागठाणे ग्रामविकास पॅनेलबरोबर झाली.
या निवडणुकीत 919 सभासदांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी झालेल्या मतमोजणीत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने विरोधी नागठाणे ग्रामविकास पॅनेलला पराभवाची धूळ चारत आपले सर्व 13 उमेदवार विजयी केले. अजिंक्य पॅनेलचे प्रकाश गोरखनाथ नलवडे, गौरव नारायण साळुंखे, दादासो जगन्नाथ साळुंखे, दिलीप आण्णा साळुंखे, निलेश यशवंत साळुंखे,सचिन आनंदराव साळुंखे,सचिन युवराज साळुंखे, हिंदुराव आण्णा साळुंखे, सौ. राजश्री अनिल मोहिते, सौ. संगीता सुनिल साळुंखे, मोहन बाबुराव राजे, शंकर धोंडी चक्के, दत्तात्रय रघुनाथ मोहिते हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील,आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पी. डी. पाटील सहकारी बॅंकेचे संचालक सागर पाटील, माजी जि. प. सदस्य यशवंत साळुंखे, सौ. सुवर्णाताई साळुंखे, माजी. पं. स. सदस्य बाळकृष्ण साळुंखे, सरपंच सौ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, माजी चेअरमन संजय साळुंखे, अजित साळुंखे(सर), कृषिभूषण मनोहर साळुंखे, मारुती जेधे यांनी अभिनंदन केले.