“भाजप विरोधात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार”; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भाजपला हरव्हायचे असेल एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबतची जाण्यास तयार आहोत,” असे जलील यांनी म्हंटले आहे.

इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकांच्यावेळी एमआयएममुळे मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. भाजपाला दूर ठेवायचे असेल तर आणि देशातून भाजप नष्ट करायचे असेल तर आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जायला तयार आहोत.

महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली. तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहणार आहोत,असे जलील यांनी म्हंटले.